Blogger Template by Blogcrowds.

श्री.हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या 'मधुकलश' कवितासंग्रहातील 'कवि की वासना' ह्या कवितेचा अनुवाद.



१.
सृष्टिप्रारंभी उषेचे गाल होते चुंबिले मी,
बाल रविच्या भाग्यशाली दीप्त भाळा चुंबिले मी,

प्रथम संध्येचे अरुण मी चुंबुनी डोळे निजविले,

तारकामंडित निशेच्या कुंतलांना चुंबिले मी,

वायुचे रसमय अधर स्पर्शायचे अधरांस पूर्वी
मृत्तिकेच्या आज मूर्तींशी कसे अभिसार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !


२.
विगत-बाल्य वसुंधरेचे तुंग स्तन उन्नत उभरले,
हरित भूमीतिल तरूंना धरुन मन्मथ-ध्वज फडकले,

चपल उच्छृंखल करांनी त्या दिनी उत्पात केला,

तो असे तळहाति लिहिला, वाचुनी जरि विश्व हलले;

सागराला प्राशुनीही राहिलो अतृप्त आहे,
कामिनीच्या कुच-घड्याशी आज का शृंगार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !



३.
इंद्रधनुवर ठेवुनी शिर, मेघ करुनी शेज सुखकर
झोपलो मनसोक्त होतो बाहुपाशी चंचला धर,

दीप, रवि-शशि-तारकांनी पाहिली ती बाह्य क्रीडा,

पाहु ना शकला कुणीही स्वप्न ती सुकुमार सुन्‍दर

ठेवुनी हळुवार गेली यामिनी जी पापण्यांवर;
ही असे बनली समाधी, हे न शयनागार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !



४.
आज माती वेढते मज पण जुना उत्साह आहे,
सोमरस जो प्राशिणारा, आज पाणी हाति आहे,

ओठ पेल्याजवळ गेले पण विवश ह्या कारणाने,

व्रत तहानेचे धरोनी बैसले मन स्वाभिमानी;

बांधलो नाही, जगा, मी देहधर्मांने, उमज तू,
जाहले विकृत जरी तन मन सदा अविकार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !



५.
लीलया सोडून ज्यांना भुलवतो सार्‍या जनांना,
असुर, मानव अन्‌ सुरांना, वृद्ध ब्रह्मा, विष्णु, हरांना,

भंग तो करतो तपस्या सिद्ध, ऋषि, मुनि, सत्तमांची

ते फुलांचे बाण दिधले मीच पंचशरास होते;

शक्ति माझ्याजवळ थोडी ठेवली हे दान देता,
तेच मारुन करु पहातो आज मन बेजार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !



६.
दोन प्राणांची घडावी भेट कैसी, भिंत हे तन
काळ ना मोजीत घटका, शृंखलांचा शब्द झन-झन,

वेद अन्‌ जनरीत प्रहरी पाळतीवर नित्य माझ्या,

बद्ध असल्या बंधनांनी काय आशा करिल यौवन !

छोटिशी इच्छाहि माझी अडकुनी कैदेत पडली,
विश्व क्रीडांगण नसे हे, विश्व कारागार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !


७.
शीत पाण्याची तृषा असता निखारे सेवले मी,
आणि चिंध्यांनी स्वत:ला त्या दिनी शृंगारले मी

वेष राजस घालण्याची प्रबळ इच्छा झालि जेव्हा,

संग्रहित करण्यास इच्छा खर्चले भांडार माझे;

वासना अत्युच्च असतानाच बनलो संयमी मी,
अन्‌ क्षुधारूपात कायम सर्व ते आहार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !


८.
काल अथ अन्‌ इति उद्या ही प्रीतिची माझ्या कहाणी,
कोण मी, मागे उरावी का जगी माझी निशाणी ?

काय मी केले जगाने जे न यापूर्वीच केले ?

का खले जर्जर जगाला मम क्षणिक यौवन-तराणी ?

लपवणे जमते मला तर जग मला साधू समजते,
शत्रु माझे, हाय, बनले, निष्कपट व्यवहार माझे !

जग म्हणे की वासनामय होत हे उद्गार माझे !

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home