एक सरोवर दोन डोळ्यांचे
नितळ, पारदर्शी
तरीही गूढ, अथांग
मासोळ्या लहान-मोठ्या विचारांच्या
दिसल्या न दिसल्याशा
पापणी लवताच नाहीशा होणाऱ्या
आणि मी काठावर
गळ टाकून बसलेलो
पाण्यात प्रतिबिंबांचा कॅलिडोस्कोप
चंचल, क्षणाक्षणाला बदलणारा
ज्यातून मासोळ्या सळसळत जातात
चपळाईने, निरुद्देश, निर्हेतुक
भूत, वर्तमान, भविष्याला सारख्याच छेदत
गळ रिकामाच
दिवस मावळतीला लागतो
रुपेरी, सोनेरी मासोळ्या काळवंडू लागतात
मिसळू लागतात, गोंधळून टाकतात
गिळू लागतात
एकमेकांना...̱गळाला... मला...
एक सरोवर दोन डोळ्यांचे...
Labels: कविता
अनेकदा विचारले तिला
पण तिच्याकडेही उत्तर नसे
मग तुकड्या तुकड्याने
माझे मलाच ते सुचत गेले
.... काहीतरी चुकत गेले
दिवस होते मंतरलेले
चिंब भिजण्याचे, बुडून जाण्याचे
आनंदात, एकमेकात
तरी मिठीत दोघांना काहीतरी खुपत गेले
.... काहीतरी चुकत गेले
दिवस होते धागे विणण्याचे
रेशमाचे, जरतारीचे
आयुष्यांना एकमेकात गुंफण्याचे
वस्त्र गुंफता गुंफताच कुठेतरी विरत गेले
.... काहीतरी चुकत गेले
दिवस होते उमेदीचे
चिवचिवत काड्या जमवण्याचे
घरटे बांधण्याचे
कळस गाठण्याआधीच घर जरा खचत गेले
.... काहीतरी चुकत गेले
काय घडले, कोण चुकले ?
पडत मात्र गेली शकले
मौनाचे वास्तव्य ओठांवरती वाढत गेले
अन् पाणी हळूहळू डोळ्यांमध्ये भरत गेले
.... काहीतरी चुकत गेले
Labels: कविता
दुबळे न ते, नि:शस्त्र ते होते जरी
तळहात होता, शीर होते त्यावरी
अद्याप दक्षिणमार्गगामी सूर्य अन्
स्वातंत्र्ययोद्धे संपले शरपंजरी
विझल्या चिता, विझले विचारांचे दिवे
उरल्यात पोथ्या आणि चर्पटपंजरी
वाटे हुतात्म्यांना किती कृतकृत्यसे
शिटतात जेव्हा पाखरे पुतळ्यांवरी
झटकू गुदस्ता सालभरची धूळ अन्
करुया जयंती फूल वाहून साजरी
पुतळे नको, स्मारक नको अन् घाटही
त्यांचे खरे स्मारक असावे अंतरी
Labels: कविता
कल्पनेची उंच माझ्या झेप आहे
की पुन्हा दुर्बोध केवळ टेप आहे?
पायवाटा शोधल्या काही नव्या मी
हा महामार्गास का आक्षेप आहे?
कोवळ्या उघडून बसलो सर्व जखमा
"रक्त सुकले", त्यांस हा आक्षेप आहे!
प्रसवताना काव्य मी विव्हळू कशाला?
दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे
ना विरोधाभास, ना साकी, न प्रीती
गझलप्रांती हा कसा प्रक्षेप आहे?
री कशी ओढू मठाच्या दांभिकांची ?
'भृंग' अज्ञेयाकडे साक्षेप आहे

तुझ्यासवे रास खेळणारी नगण्य होते अनामिका मी
तुझ्या निळाईत रंगल्याने अहेव झाले कुमारिका मी
न अष्टराण्यातली तुझ्या मी, न कैद नरकासुरागृही मी
तरी जिला जोडले तुझ्याशी युगे युगे तीच राधिका मी
तुझ्या महालात झुंबरांचा हिरेजडित लखलखाट आहे
तरी मनी कोपऱ्यात एका अखंड तेवेन दीपिका मी
स्यमंतकाचा मला न हेवा, न, वैजयंती, तुझी असूया
सबाह्य अभ्यंतरी हरीच्या फुलेन गंधाळ मल्लिका मी
ठरेन वृंदावनात जारा, ठरेन व्यभिचारिणी जगी मी
म्हणून आक्रोश मूक माझा, मुकीच गाते विलापिका मी...
