Blogger Template by Blogcrowds.

कथा

ज्यात वत्सल प्रेमपान्हा कोरडा तो ऊर होतो
वैर भाळाशी धरे जो मी असा सिंदूर होतो

सिंचतो अलवार केव्हा अन् प्रसंगी क्रूर होत
चिंब भिजवून मूक धरती मेघ गरजत दूर होतो

राळ अफवांची उडाया लागते जेव्हा सभोती
अंग तो दुष्यंत झटके, कण्व लाजुन चूर होतो

पुस्तकी विसरा कथा ती कासवाची अन् सशाची
फसवुनीही शशक प्यारा, कूर्म नामंजूर होतो

का जुन्या माझ्या चुकांचे वाचता अद्याप पाढे ?
खाद्य पापांचे नव्या पुरवीत मी भरपूर होतो !

नांगरावाचून नौका, नीड नसलेला विहंग
ना दिशा, ना ध्येय, मी तर दोर तुटलेला पतंग

मोजक्या शब्दात केले मोकळे मी अंतरंग
लाट सरली भावनांची, राहिले मागे तरंग

जळमटे, कोळिष्टके सांभाळली होती मनाची
अन् चिरेबंदी मतांचा राखला वाडा अभंग

तिष्ठला दारात माझ्या देव हे कळलेच नाही
वीट दिसली, का न दिसला त्यावरीचा पांडुरंग?

ह्या जगाची नाळ आता कापण्याची वेळ आली
वाजवा सनई, असे हा जन्म घेण्याचा प्रसंग

शोध नवतेचा मला, मृत्यो, तुझ्या दारात आणी
पाहुनी झालेत सारे जीवनाचे रागरंग

पाहुया कोणा कवीची दिव्य प्रतिभा दीप्त होते
ये निषादा, बाण चालव, क्रौंच मी मिथुनात दंग

चुंबनेही हातची राखून येते
ओठ हल्ली ती जरा मुडपून येते

भेटते रस्त्यात ती परक्याप्रमाणे
हास्यही तोलून अन् मापून येते

गर्व हा नाही बरा, लावण्यमित्रा
वेळ अस्ताची कुठे सांगून येते

ती जणू होते घटोत्कच सांजकाळी
शस्त्र मायावी स्मृती परजून येते

मी उभा निःशस्त्र, शरणागत, पराजित
दैव घावांची रसद घेऊन येते

लागतो डोळा पहाटे मुष्किलीने
झोपही डोळा जणू चुकवून येते

रात्र असते पौर्णिमेच्या चांदण्याची
स्वप्न सरते, जाग येते, ऊन येते

वाटते की नीज कायमचीच यावी
स्वप्नवेळा प्रेयसी साधून येते

शाश्वती देऊ नये कोणी उद्याची
सावली सध्यातरी मागून येते

एकटेपण यापुढे छळणार नाही
सोबतीला दुःख आवर्जून येते...

Newer Posts Older Posts Home