न देहबोली तिला उमजली, न स्पंदनांचा तिला सुगावा
मनातले बोलता न आले, कसा मिटावा तरी दुरावा?
किती किती बोलले नयन हे, रचून झालीत खंडकाव्ये
म्हणे तरी ती, सख्या, मजवरी, कधीतरी शेर तू रचावा
कराल एकाग्र चित्त, सांगा, तपात केव्हा ऋषी-मुनींनो
अरे, तपोभंग अप्सरांनी दुशासनांचा कसा करावा?
अनेक झाल्यात धर्मशाळा, अनेक घरटी, अनेक माड्या
सखी धरेच्या मिठीत स्नेहल, दयाघना, दे अता विसावा
असो मधाची अवीट गोडी, मृदुल फुलांच्या असोत शय्या
'मिलिंद', काट्यात वेढलेल्या सुमात का जीव गुंतवावा?
Labels: गझल
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)