नि:शब्द होत गेलो, कणसूर होत गेलो
तेव्हा कुठे जगाला मंजूर होत गेलो
ठिणग्या विझून गेल्या, जमले न पेट घेणे
केवळ जरा धुमसलो अन् धूर होत गेलो
धारा न अमृताच्या वळल्या फिरून मागे
जो ओसरून गेला तो पूर होत गेलो
झाल्यात पोसलेल्या जळवा कशा टपोर्या
माझीच चूक आहे, मी ऊर होत गेलो
स्मरणातुनी जगाने पुसले असे मला की
वैधव्यग्रस्त भाळी सिंदूर होत गेलो
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
पाहता पाहता काजळू लागला
सूर्य माध्याह्निचा मावळू लागला
कंपने वाढली, चाल मंदावली
भार संवत्सरांचा कळू लागला
पाखरे पांगली दूर देशांतरी
वृक्ष होता तिथे उन्मळू लागला
देह एका तिरी, नेत्र दुसर्या तिरी
पूल दोघांतला कोसळू लागला
कावळे पिंड सोडून गेले कुठे ?
प्राण मधल्या मध्ये घुटमळू लागला
Labels: ghazal, Marathi ghazal, गझल, मराठी गझल
Subscribe to:
Posts (Atom)
