Blogger Template by Blogcrowds.

गाभ्यात पोचुनीही मन तृप्त होत नाही
वय वाढले तरीही संन्यस्त होत नाही

सरतात पावसाळे, सुकतात प्रेमधारा
का मोसमी झरा हा गंगौघ होत नाही?

कोणी मुहूर्त पाही, कोणी वहात जाई
वणव्यात ह्या न कोणी जो दीप्त होत नाही

पश्चात मीलनाच्या होतात भिन्न वाटा
एका विभावरीचे* आयुष्य होत नाही (*विभावरी = रात्र)

विसरून दीर्घ नाते सुटतात सैल नजरा
काळ्या मण्यात वृत्ती बंदिस्त होत नाही

पृथगात्मता जपावी तादात्म्य पावताना
कोणी कधी कुणाचे आजन्म होत नाही

प्रेम तीर्थ वा धाम नाही
बस, विरंगुळा, काम नाही

भान हरपणे प्रीत मागे
तेव्हढे तिचे दाम नाही

एकनिष्ठ राहू कसा मी?
कॄष्ण पूजितो, राम नाही

हो, पवित्र आहे - मनाने
(देह तेव्हढा ठाम नाही)

पाप मानवांचा न मक्ता
इंद्र काय बदनाम नाही?

भैरवी करा मैफिलीची
जी विराम, निजधाम नाही

गझल

उमलून वांझ माझे सारे वसंत गेले
करुनी मला शिशिरही, बघ, नापसंत गेले

चित्कारतो न हल्ली क्षितिजास पाहुनी मी
सांगून सत्य त्याचे मज बुध्दिमंत गेले

साकेत ना मिळाला, साकी तरी मिळाली
पेल्यात वारुणीच्या मग खेद-खंत गेले

माडी म्हणू नका, ही आहे पवित्र वास्तू
पावन करून तिजला मुल्ला-महंत गेले

आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले

Newer Posts Older Posts Home