शांती पुरोहितांच्या प्रणवात सापडेना
तृप्ती सराइतांच्या प्रणयात सापडेना
देईल साथ माझी भवसागरात अवघ्या
तो ओंडका मला ह्या लाटांत सापडेना
प्रत्येक चावडीवर पिंपळ झपाटलेला
अश्वत्थ भूवरी पण पारात सापडेना
बाहूतही प्रियेच्या मज सापडे सराई
घर एकही मला ह्या गावात सापडेना
डोळ्यात भावदर्पण, ह्रदयात प्रीतवादळ
त्यांचे अबोल स्पंदन शब्दात सापडेना
Labels: गझल
वादळी वाऱ्यात होडी लोटली
का मिठी, बाल्या, तुझी सैलावली ?
कालचे अल्लड नयन झुकले जरा
वारुणीला सवत आता लाभली
लावता पेल्यास ओठाला तिने
त्या नशेने द्राक्षकन्या लाजली
कोट ह्रदयाभोवती होता तरी
ती कशी अलगदपणे सामावली
काय सांगू राख कैसा जाहलो
होउनी सौदामिनी ती भेटली
Labels: गझल
भृंग, लोंढा सोसवेना माणसांचा
अन् दुरावाही रुचेना माणसांचा
अजगरांना टाळता येते इथे पण
ह्या जगी विळखा सुटेना माणसांचा
सर्पसत्राचा भले संकल्प सोडू
दंश तो काही चुकेना माणसांचा
मानतो मी, बेट होणे ठीक नाही
एकही सेतू दिसेना माणसांचा
भेटतो तो बोलतो बाजारभाषा
शब्द कानावर पडेना माणसांचा
सांग मी गाठू कशी सम जीवनाची
सूर काही सापडेना माणसांचा
शर्थ केली जाळण्याची ईश्वराने
पीळ पण जळता जळेना माणसांचा
कण धुळीचा एक पुरतो आसवांना
प्रीतिने डोळा भिजेना माणसांचा
ब्रह्मदेवा, बांधसी गाठी कशा तू?
जन्मभर गुंता सुटेना माणसांचा
वाळवंटासम असे हे शुष्क घरटे
हाय, ओलावा मिळेना माणसांचा
ठेवतो अस्थीकलश आम्ही सुरक्षित
(होय, आत्मा सापडेना माणसांचा)
Labels: गझल
