Blogger Template by Blogcrowds.

असे भान हरपून गेले तिच्या दर्शनाने

मला स्वप्ननगरीत नेले तिच्या दर्शनाने



तिला पाहिले, भासले फूल झाले कळीचे

बहरले मनी लाख झेले तिच्या दर्शनाने



तिला छेडणार्‍या कवडशांस का दोष द्यावा ?

शशी-सूर्यही मातलेले तिच्या दर्शनाने



प्रतीक्षेत होती जरी शांभवी सोबतीला

परी लाजले मद्यपेले तिच्या दर्शनाने



गुन्हा प्रीतिचा मान्य आहे मला सर्वथा पण

प्रमादास प्रवृत्त केले तिच्या दर्शनाने



मिलिंदा, पहा आजही वाचली जात गीता

असे विश्व भारावलेले तिच्या दर्शनाने

समजुनी बसलाय ऐरण माणसाला
देव भेटे होउनी घण माणसाला


रोजची आहे लढाई भाकरीची
रोजची पोटार्थ वणवण माणसाला


जू असे मानेवरी, ओझे शिरावर
वेतनाचे शुष्क वैरण माणसाला


स्वच्छ ठेवा, स्वच्छ ते सांगेल सारे
आपले मन हेच दर्पण माणसाला


ब्रह्मकमळासारखी त्याची प्रतीक्षा
सर्जनाचे मोजके क्षण माणसाला


अस्वलाला नाचवी दरवेश जैसा
दैव बांधे चाळ-पैंजण माणसाला

किती शब्द गिरवून पाहिले, परंतु कोरी पाटी
बोटे झिजली, मीही झिजलो; कशास ? कोणासाठी ?


घडण मनाची एकलकोंडी, हृदयी भावविवशता
एकरूप कवितेशी करते, उपरा लोकांसाठी


अनुभूतीचे असे दंश की सर्पांनी लाजावे
रक्त कमी, धमन्यांतून झाली हलाहलाची दाटी


कटूपणाला पिळवटून ये कटूच रसनिष्पत्ती
कसा गोडवा यावा शब्दांतून पेरण्यासाठी ?


मनातल्या गाळाचा निचरा कवितेमधुनी केला
भागिरथीसाठी कवनाच्या किती उपसली माती


किती समीधा ओळींच्या अर्पून पेटता ठेवू ?
हविर्भाग जगण्याचा देतो लेखनयज्ञासाठी...

Newer Posts Older Posts Home