Blogger Template by Blogcrowds.

खोलवर सार्‍या मनांच्या गाडली आहे तृषा

मात्र वसने सोवळ्याची नेसली आहे तृषा 



'लोककल्याणार्थ' काया झिजवणारे पाहिले

त्याच गरजा 'सज्जनांच्या', 'त्यातली' आहे तृषा



हो, दिला फेसाळ प्याला, मात्र डोळे चुकविले

हाय, साकीने न माझी जाणली आहे तृषा 



उष्ण श्वासांनी कुणाच्या पेटवावी पुनरपी

थंड नजरेने तुझ्या जी गोठली आहे तृषा ? 



काल मधुशालेत बसलो पंडितासोबत जरा

लागली परमेश्वराची; बाटली आहे तृषा



वैष्णवाला नेत आहे आज मधुशालेत मी

त्यासही सोमेश्वराची लागली आहे तृषा



कुंकवाचा घ्या करंडा अन्‌ भरा मळवट तिचा

साथ ती आजन्म देते, सावली आहे तृषा 



जीवनाच्या दोन घोटांहून नव्हते मागणे

लीलया त्यांच्यातही सामावली आहे तृषा



वारुणी मी जीवनाची आणली होती किती ?

संपली ती, संपलो मी, संपली आहे तृषा



द्याल अग्नी मज जिथे, बांधा तिथे मंदिर तिचे

माझियासंगे सती ही चालली आहे तृषा

एक वाट रेंगाळणारी
दारावरून जाते
घाईत असणाऱ्या माणसांच्या
वर्षानुवर्षे
चावडीपासून चौकापर्यंत


गोष्ट फार जुनी नाही
तेव्हा चावडी फुललेली असायची
एकमेकांच्यात रमणाऱ्या माणसांनी
त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पांची साक्षीदार


आणि वाट दिवसातून दोनदाच गजबजायची
पोटार्थी प्रवासाने
सकाळची ताजी, कर्तव्यदक्ष पावले
संध्याकाळची श्रांत पण उत्सुक...


वाट जुनी
तिला सोसत नाही
ही चोवीस तासांची वर्दळ
कळत नाहीत
जगाच्या दुसऱ्या टोकाच्या घड्याळावर धावणारी माणसे
तिच्या विश्वाची व्याप्ती
वर्षानुवर्षे
चावडीपासून चौकापर्यंत...


आता चावडी निर्जन, ओस
माणसे व्हर्च्युअल कोशातून 'मित्र विनंती' करणारी.
व्हर्च्युअल जगाच्या व्हर्च्युअल मित्रांच्या
व्हर्च्युअल संख्येची व्हर्च्युअल स्पर्धा बघून
चावडी वाटेला विचारते,
"काय गं, पिंगमध्ये असतो का
खांद्यावरील हाताचा आश्वासक स्पर्श ?"


वाट हसते बोळके दाखवत, म्हणते,
"अगं, असं काय करतेस ?
आपण दोघी जन्माला आलो
तेव्हा असेच प्रश्न पडले होते ना
जंगलांना आणि गुहेंना..."

कधी हसणे, कधी रडणे जगी चुकले न कोणाला
कटू हे सत्य काही पण जगी पटले न कोणाला

किती उध्वस्त झाले जीवघेण्या क्रूर जगण्याने
लढा हा एकतर्फी अन् शरण चुकले न कोणाला

शिकवली रीत जगण्याची भिकारी पुण्यश्लोकांनी
इथे सद्वर्तनाने लाभले इमले न कोणाला

असे हव्यास कायेला किती कायेस भिडण्याचा
कसे दुःखास भोगावे कधी कळले न कोणाला

गुलाबी घालुनी कोडे निजाया गडकरी गेले
परी पोटातल्या आगीपुढे सुटले न कोणाला

असो बुद्धी, असो मेहनत, असो निष्ठा, असो अब्रू
कितीही काय कामाचे अगर विकले न कोणाला

कुणाला प्रश्न 'कोहम्?' हा कुठे हल्ली इथे पडतो
भुकेला तत्त्वज्ञानाचे धडे पुरले न कोणाला

करत उच्चारवाने घोषणा विक्षिप्त मुक्तीच्या
स्वतःला आजवर जे जे विकू शकले न कोणाला

किती सेवून गेले भृंग गोडी काव्यसुमनांची
तुझ्या शब्दांतले काटे कसे खुपले न कोणाला ?

Newer Posts Older Posts Home