Blogger Template by Blogcrowds.

काल पुन्हा शहरात बॉंब-स्फोट झाले.
अजून मॄतांची मोजदाद करत आहोत आम्ही
जोडून इतस्तत: विखुरलेले मांसगोळे...
धूत आहोत रक्तरंजित रस्ते
पावसाच्या मदतीने,
जो आला नित्याच्या सरकारी गोंधळाला.

बातमीदार जमले तरसांच्या कळपाप्रमाणे
रक्तमांसाच्या वासावर
'ब्रेकिंग न्युज्‌" ची मेजवानी झोडायला.

नवीन काहीच नव्हतं.
अनाम, बिनचेहऱ्याची माणसं करत होती मदत
गाजावाजा न करता
आपल्यासारख्याच ओळखहीन माणसांना.
नेहमीचेच चित्र
ज्याची सवय झाली आहे शहराच्या थिजलेल्या नजरेला.

हजारो घरांसाठी मात्र
काळरात्र नुकतीच सुरू झाली आहे.


माझ्या "Another day, another bomb" ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद.

हा माझा भास आहे
की खरोखर गाणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत ?
कोणत्या उज्ज्वल पहाटेची ते मूक प्रतीक्षा करत आहेत
भयाण, न संपणाऱ्या रात्रभर ?
ही स्मशानशांतता साक्ष आहे
सर्वदूर पसरलेल्या भीतीची
आणी गिळंकृत झालेल्या वडिलोपार्जित घरट्यांची.

वनरक्षकांनीच हाती घेतल्या आहेत कुऱ्हाडी
वृक्ष धारातीर्थी पडत आहेत; धरा थरथरते आहे
पक्ष्यांच्या गायनाच्या जागी कानी येत आहे
निर्वासितांचे अरण्यरुदन.
खाकीधारी करत आहेत शिकार
आणि तुटून पडत आहेत गिधाडे
घरट्या-घरट्यातील पक्षिणींवर...

कॉम्रेडहो, आनंदोत्सव साजरा करा
मार्क्सचे भाकीत खरे ठरले आहे :
-राज्य क्षीण होत होत नष्ट झाले आहे !




माझ्या The Nests of Nandigram ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद.

"तुझ्यासारखे तुझ्याप्रमाणे इथे न कोणी" ही जमीन सुचवल्याबद्दल व गझलेची इस्लाह (दुरुस्ती) केल्याबद्दल श्रीयुत चित्तरंजन भट यांचा मी ऋणी आहे.

तुझ्यासारखे , तुझ्याप्रमाणे इथे न कोणी
तुझे आमच्यापरी दिवाणे इथे न कोणी

दुरावा नको, नकोच आता सलज्ज सबबी
पुरे, लाडके, तुझे बहाणे, इथे न कोणी

असे औटकाळ यौवनाची मिरासदारी
वसंतात का उगी रहाणे ? इथे न कोणी !

नवा खेळ हा, नवीन अनुभव मिळून घेऊ
मध्ये रोखण्या जुने-पुराणे इथे न कोणी

फुलू देत बेलगाम ज्वाळा तनामनाच्या
पुरे धुमसणे, विझून जाणे, इथे न कोणी !

निशा घालवू नकोस तू बोलण्यात वाया
किती घ्यायचे तरी उखाणे, इथे न कोणी !

बघायास तुज निरभ्र झाले अधीर डोळे
कशाला असे सचैल न्हाणे, इथे न कोणी

Newer Posts Older Posts Home