तिचे श्वास देतात ग्वाही
तिचे मौनही अर्थवाही
सुरा की सुरी मत्त डोळे ?
नशाही, जखम काळजाही
कधी भान हरपून बिलगे
कधी लाजणे अंत पाही
कसे थोपवू मी स्वत:ला ?
घडी मीलनाची प्रवाही
चितारी तिची शब्दचित्रें
असे लेखणी मर्मग्राही
Labels: गझल
वरदानदोष थोडा परमेश्वरात होता
हृदयात मारुतीच्या बघतो स्वत:स राघव
सीते, तुझ्याच वेळी का संभ्रमात होता ?
जे पुण्य जोडले मी त्याच्याच जर कृपेने
पतनात काय माझ्या त्याचा न हात होता ?
वाजे न एकहाती टाळी जगी कधीही
नारीत दोष थोडा, थोडा नरात होता
दररोज प्रश्न पडतो मज फूल वेचताना
कुठल्या सवत-सुभ्याचा* हा पारिजात होता ?
साशंक ऐकले मी आदेश प्रेषिताचे
हेतू खरा तयाचा अवगुंठनात आहे
युद्धास अंत नसतो, इतिहास साक्ष होता
पुढल्या समरबिजाचा अंकुर तहात होता
दिसतात खुरटलेली येथे अनेक रोपं
वडसावलीत कोणी, कोणी उन्हात होता
पाहून भैरवीला ज्याचा न ताल चुकला
त्याच्याच मैफिलीचा शेवट सुरात होता
चरणी, प्रभो, तुझ्या तो सुमनात 'भृंग' आला
शोधात कमलिनीच्या जो कर्दमात होता
* - ही टंकलेखनाची चूक नाही. मला 'सवतासुभा' नाही, 'सवत-सुभा' असेच म्हणायचे आहे.
Labels: गझल
जन्म घेता ऊर मागे, स्कंध अंती चार मागे
अडचणीला हात मागे, मैथुनाला साथ मागे
ओढणीचा शेव मागे, पूजण्याला देव मागे
नर्तकींचा बार मागे, वर सुखी संसार मागे
न्याय मागे चार साक्षी, धर्म कंठी हार मागे
सूत्र मंगळ बायको अन् जडजवाहिर जार मागे
शुद्ध बैलोबा पती पण मर्द, बांका यार मागे
वागणे व्यवहार मागे, भिंत पण सुविचार मागे,
हार मिळतो त्या गळ्याला जो खरा तलवार मागे
माणसांचे काय, अमुचा देवही सत्कार मागे
वेद हिंदू चार मागे आणि गीतासार मागे
बांग देणारा मुअझ्झिन उंच ते मीनार मागे
धर्मयुद्धाची तुतारी नेहमी अविचार मागे
धर्म तो संस्थापण्याला कृष्णही संहार मागे
मागण्याची लाज कसली, मागणे हा हक्क आहे
मीच संकोचून का मग राहिलो नादार मागे?
Labels: कविता
मौक्तिकांत शिंपला शोधू
नायकातही खला शोधू
कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू
शर्यतीत मी कसा धावू ?
सोड, जातदाखला शोधू
का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?
खोल डोहसे तिचे डोळे
त्यात हरवल्या मला शोधू
सोडुनी जुनी भ्रमरवृत्ती
घट्ट प्रेमशृंखला शोधू
पैज अमृतातही जिंके
अशा शब्दआंचला शोधू
इंद्र होउनी उभा याचक
धाव, कवच-कुंडला शोधू
अनसुया, प्रियंवदा नसता
'भृंग', चल शकुंतला शोधू
Labels: गझल
