Blogger Template by Blogcrowds.

घे तुझ्या बाहूत शीतल, त्या जगी पोळून आलो
दे विसावा माय गंगे, राख मी होवून आलो

ही न वसने आवडीची, क्लेशदायक बंद ज्यांचे
रेशमाचे पाश ज्याचे वीण ती उसवून आलो

साथ अंबर, साथ तारे जे अनंताचे इशारे
मर्त्य, चकव्या सोबत्यांची साथ मी सोडून आलो

स्फुंदणाऱ्या लेखणीला सत्य हे सांगू कसे की
कोरडी झालीस तू अन् मी रिता होवून आलो

शब्दही देती दगा का, भृंग, ब्रह्मास्त्राप्रमाणे
शाप कोणा भार्गवाचा का शिरी घेवून आलो ?

समजू नकोस भोळी, चवचाल बाग आहे
आमीष सौरभाचे, मतलब पराग आहे

चित्रास श्वेत-श्यामल करडी छटाच शोभे
भरलास रंग तू जो तो रंग डाग आहे

जगण्यास एकसूरी कैसा सरावलो मी
बहुतेक रागिण्यांचे दर्शन महाग आहे

पृथगात्मता जपावी तादात्म्य पावताना
ही सावधानता ह्या हृदयास भाग आहे

सुटणार चिंतनाने नाहीत प्रश्न सारे
हातात शस्त्र घेण्या आम्हास भाग आहे

विस्तीर्ण सागरावर ओवाळ जीव सरिते
निर्झर जयास शोभे मी तो तडाग आहे

निष्पापांवर उठता राक्षस
नि:पात त्यांचा निश्चित श्रेयस
गर्भवतींवर बळजोरी हे कसले गर्भाधान
उदरातिल गर्भांवर चाले सूडाचे अभियान ।

क्रोधित नजरा, विकृत मानस
गृध जमले अन जमले वायस
प्रतिशोधाने पेटून बनले कसे सर्व सैतान
उदरातिल गर्भांवर चाले सूडाचे अभियान ।


गुरुपुत्राचे असती वारस
त्याचे पुत्र-प्रपौत्र अनौरस
आक्रंदती उत्तरा-द्रौपदी, कुठे कृष्ण भगवान
उदरातिल गर्भांवर चाले सूडाचे अभियान ।

जिथे माळला तिथे दिसे हा खुलून गजरा
कधी कुंतली, कधी मनगटी सजून गजरा

जरी रात्रभर फुलून गेला थकून गजरा
तनू गंधिता करून गेला पिचून गजरा

इथे इंगळी मदनज्वराची डसे जिवाला
तिथे आग पेटवून गेला निवून गजरा

जरी ती नको नको म्हणे पण खरे नव्हे ते
जुमानू नको विरोध, जा विस्कटून गजरा

नव्याने तुला पटेल ओळख कळी-कळीची
नव्याने पुन्हा बघून जा उलगडून गजरा

तसा मत्सरी स्वभाव नाही जरी कळ्यांचा
परी स्त्रीसुलभ तपास घेतो कसून गजरा

जरा टाकता कटाक्ष मी वेगळ्या फुलावर
कसा रात्रभर अबोल होतो रुसून गजरा

असे काय बोललास गुंजारवात त्याला
पहा, भृंग, लाजण्यात गेला गढून गजरा



टळून गेली दुपार तरिही अजून का सांज येत नाही
अधीर हा सूर्य पेटलेला, अजून का चांद येत नाही

तुझ्या कृपेचे अनेक सागर हसून मी घोट घोट प्यालो
अजून जीवन तसेच अळणी, अजून का स्वाद येत नाही

चिणून भिंतीत हुंदक्यांना सजेल खिडकी मुक्या फुलांनी
भकास रात्रीत पैंजणांचा उगाच आकांत येत नाही

जसे जसे जीर्ण होत गेले सुडौल मंदिर, तरूण मूर्ती
चिरा चिरा सैल होत गेला, अता कुणी भाट येत नाही

विषण्ण रस्त्यात गाठ पडली न डोंगरांची न टेकड्यांची
सपाट वाटेत जीवनाच्या मनातले घाट येत नाही

लपेटलेली धुक्यात येते पहाट हल्ली उदासवाणी
सकाळच्या का समेवरी ती, सखे, जुनी दाद येत नाही ?

प्रयाग शोधून सापडेना, मिलिंद, वाहू जगी समांतर
अजून कानात सागराची कशी परी गाज येत नाही ?

इतका अधीर होऊ नकोस
न्यायासाठी, सूडासाठी
मनाच्या जखमा भरण्यासाठी
तेराच तर वर्षे झाली आहेत
दळू दे अजून काही काळ
आंधळ्या न्यायदेवतेला
शिल्लक असावीत अजून काही
कुत्री पीठ खायची

स्फोटांचे एव्हढे मनावर घेऊ नकोस
ते होतच असतात
माणसे मरतच असतात
मरण्यासाठीच जन्माला येतात
पण आत्मा अमर असतो
अनादी , अनंत असतो
वेळच वेळ असतो त्याच्याकडे
म्हणून...
मेलेल्यांसाठी गळे काढू नकोस
इतका अधीर होऊ नकोस

आडून पापण्यांच्या तिरपा तपास आहे
डोळ्यात रंगलेला रजनीविलास आहे

दारात कल्पनांच्या असलो जरी भिकारी
शब्दांत मात्र माझी मोठी मिजास आहे

येथेच रोषणाई भोगून घे, नटा, तू
पडताच काळपडदा अज्ञातवास आहे

बोले इमान जैसे फटकार आसुडाचे
विश्वासघातक्यांची वाणी मिठास आहे

बांधावयास तिरडी जमली अलॊट गर्दी
हर एक मित्र त्याचा मुडदेफरास आहे

कवनात रंग माझ्या शोधू नका गुलाबी
हा सत्यशोधनाचा माझा प्रवास आहे

होते अनेक शत्रू जेव्हा जिवंत होता
आता अजातशत्रू, मयता, प्रवास आहे

येईल लेखणीला केव्हा तरी सफाई
इतकाच वर मला दे, इतकीच आस आहे

सांजावली उन्हं, सखे, नयनदीप तेवु दे
निशिगंध होवुनी तुझा धुंद श्वास येउ दे

आरक्त पश्चिमेत तो क्लांत सूर्य मावळे
सवितेस घेउनी उरी सागरास चेतु दे

जाईजुईस वाहिले कितिकदा पदी तुझ्या
ओठांवरी कधीतरी अधरपुष्प ठेवु दे

ये वाजवीत नूपुरे, छुनुन छून छुनुन छुन
गात्रांतली सतारही त्या लयीत छेडु दे

डोळ्यात काजळी निशा, गाल रक्तभारले
भांगात स्वप्न सिंदुरी, रम्य चित्र देखु दे

शिकविलेस जे गाणे मला अजूनही मी गात आहे
षडज पेलला नाही जरी, लयीत मी निष्णात आहे

नखशिखान्त तू लावण्यमूर्त लाजभारे वाकलेली
तनुलतेस जो येई सुगंध कोणत्या पुष्पात आहे

सुखमयी अशा या वेदना अजाणता देऊन जाशी
उमलत्या कळीचा, साजणी ग , कोवळा आघात आहे

जवळ तू तरीही बोललो न गूज कानी प्रेमिकांचे
बहरलीस तू, मी कैद मात्र वादळी मेघांत आहे

मृदुल मोरपंखी स्पर्श हा इमान डोलावून जाता
वचनबध्द मी राहू कसा ग, खोट ही रक्तात आहे

फार काही मागत नाही, घेऊ नका आडकाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी
नसेन पुत्र मी कुणाचा
आज्ञाधारक अन् शहाणा
नसेन भाऊ, दादा, भाचा
केवळ अलाणा-फलाणा
जरा मोकळा राहू द्या, येऊ नका माझ्या पाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन पती अर्धांगीचा
बैल जुंपलेलो घाणा
नसेन वडील मी मुलींचा
पायी झिजल्या वहाणा
जाईन गणिकेच्या कोठी अथवा संन्याश्यांच्या मठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

नसेन मित्र मी दोस्तांचा
म्हणू दे माणूसघाणा
नको कोणत्याही पेशाचा
धंदेवाईक बहाणा
मनीषा ही एक आहे, जवळ आली आता साठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

साखळदंड दायीत्वाचा
तुटे ना कितीही ताणा
अर्ज करता मी रजेचा
करता किती हो ठणाणा
मुक्त श्वास घेईन मी, सोडा सार्‍या निरगाठीं
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

भार उतरू दे डोईचा
पाठीचा वाकला कणा
देई यत्न लिहिण्याचा
सृजनाच्या सुखद वेणा
फावला तो वेळ मिळता करीन लेखनकामाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

व्यापार चारच दिवसांचा
लाख मोलाचा पण जाणा
आयुष्याच्या भैरवीचा
वाजू लागला तराणा
हिशोब मांडीत बसले चित्रगुप्ताचे तलाठी
चार दिवस कधीतरी जगीन म्हणतो स्वतःसाठी

Newer Posts Older Posts Home