Blogger Template by Blogcrowds.

सूर्य राहूशी मिळाला, कृष्णपक्षी चंद्र झाला
दीपही प्रत्येक विझला, ठेवला ज्यावर हवाला

तामसांचे राज्य उलथू पाहतो नाठाळ तारा
कृष्णविवरा घाल वेढा बंडखोरांच्या नभाला

दाटते डोळ्यांत काळी संभ्रमांची मेघमाला
मांदियाळी आसवांची छेद देते काजळाला

गस्त घाली भोवताली भुंकणाऱ्यांची शिबंदी
वास मृगयेचा अशाने येत आहे संगराला

जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरं
तीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशाला

प्राशिले तू नीळकंठा एकदा केवळ हलाहल
रोजचे मंथन अम्हाला, वासुकीचा रोज प्याला

माणसांनी पेटण्याचे दिवस ते सरले कधीचे
गूल शब्दांचे निरर्थक घासणे आता कशाला

हो चिरंजीवी अशा आशीष का देता फुकाचा ?
काय महती अमृताची जीविताच्या शापिताला ?

रोज सकाळी पहिलं पान
उजळ माथ्यानं मिरवीत असतं
चढता आलेख संस्कृतीचा
आकडे फुगत असतात कर्तृत्वाचे
गाडीच्या डब्यातील सामूहिक पुरुषार्थाचे
रक्षणकर्त्यांच्या अभंग निष्क्रीयतेचे
निर्लज्ज समर्थनांचे, नासलेल्या आयुष्यांचे
दोन दिवसांत धुरळा खाली बसतो
वार्ताहर पुढल्या बाई(ट)कडे निघून जातात
जाहीर होते सरकारी किंमत
गेलेल्या अब्रूची
आणि उभा राहतो चक्रव्यूह
इस्पितळांचा, पोलीस ठाण्यांचा,
आंधळ्या, बहिऱ्या, नपुंसक न्यायालयांचा
ज्यात अडकून अभिमन्यू होतो अश्वत्थामा
कधीही न भरणारी जखम घेऊन
जगण्याचा शाप भोगणारा
...
मी चुकचुकतो एकदोनदा
वाफाळल्या चहाचे घुटके घेताना
आणि उलटतो पान वर्तमानपत्राचं
अन जातो रंगून पेज थ्रीवरील
मोहक अल्पवस्त्रांकितेला निरखण्यात...


ह्या कवितेचं इंग्रजी भाषांतर इथे वाचा.

तुझ्या स्वरांचा कसा रुचावा सनातन्यांना बाज नवा
हवे तयांना जुने बोल अन् तुझा गड्या पखवाज नवा

नकोस मांडू मनोगतें वा व्यथा-वेदना यापुढती
रसिकजनांच्या अंगावरती पूर्वग्रहांचा साज नवा

नको रूपकें,अन्योक्ती वा अलंकार, नुमजे त्यांना
नका उभारू कोणी येथे प्रतिभेचा, रे, ताज नवा

भाट हवे दरबारी यांना, लुसलुशीतसे शब्द हवे
तप्त सळीसम कानी घुसतो सत्याचा आवाज नवा

शिकार करण्या माझी जमले पवित्रतेचे पाईक हे
मला पाहुनी इथे जन्मतो रोज एक नाराज नवा

पुन्हा होम शब्दांचा माझ्या मंबाजींनी मांडियला
पुन्हा आहुती माझी मागे दिवाभितांचा याज नवा

पाऊस

थोडासा पाऊस आयुष्यात पडून गेला
मेघांचा अंश कुशीत वसुंधरेच्या रुजवून गेला
पृथ्वीच्या मिठीत विसावले
वीजेचे लखलखते अधीर पाते
ढग़ांचा रुद्रतांडव ताल समेवर येऊन गेला
थोडासा पाऊस आयुष्यात पडून गेला

त्या वादळाची आवर्तनं
आज पुन्हा अस्वस्थ करू लागली
वैशाखमाती आषाढाची आस धरू लागली
राखेच्या आकांक्षांना नवा कोंब फुटला
तृषार्त क्षेत्राचा पुन्हा तोल सुटला
पानगळीला वसंताचा साक्षात्कार घडून गेला
थोडासा पाऊस आयुष्यात पडून गेला

गंजलेल्या तारांना सौदामिनी छेडू लागली
पेंगुळल्या होमकुंडाला जाग येऊ लागली
विझलेल्या, थिजलेल्या समिधा भगभगू लागल्या
भिजलेल्या मातीच्या गायनाने आसमंत भरून गेला
थोडासा पाऊस आयुष्यात पडून गेला

काळोख पिंजण्याचे घेऊन भाग्य आलो
अवचित प्रकाशण्याचे घेऊन भाग्य आलो

हातावरील रेषा जुळवून शोधतो मी
कुठल्या सिकंदराचे घेऊन भाग्य आलो

हातात हात आला, आला, सुटून गेला
मी हात चोळण्याचे घेऊन भाग्य आलो

जगती नसेल उरले काहीच सर कराया
म्हणुनी पराभवांचे घेऊन भाग्य आलो

शरपंजरी न पडलो, ती थोरवी न माझी
अन् दक्षिणायनाचे घेऊन भाग्य आलो

पाताळलोक सांप्रत या भूवरी असावे
तेव्हां चिरंजीवांचे घेऊन भाग्य आलो

जगण्याशिवाय जमले नाही, मिलिंद, काही
सामान्य माणसांचे घेऊन भाग्य आलो

जरी पैलतीरी विसावे जिवाचे
तुला छंद का माणसा पोहण्याचे

मयूरा, पिसारा कधीचा गळाला
तरी का तुला वेध हे पावसाचे

भरू लागल्या खोल जखमा मनाच्या
जरा मीठ चोळा पुन्हा सांत्वनाचे

सखीच्या मनाचा नसे थांग काही
कसे अर्थ लावू मुक्या स्पंदनांचे

असे वास, रक्ता, तुझा ओळखीचा
पहा पातले झुंड वार्ताहरांचे

नसे पालखीला कुणी आज भोई
नको आज ओझे कुणाला कुणाचे

कितीही जळो दीप दीपावलीला
तरी राज्य अंती अमेच्या तमाचे

तुला कैद केले जरी पाकळ्यांनी
इरादे तसे सभ्य होते फुलांचे

Newer Posts Home